शासनातील माझी पहिली वादावादी आजच्याच दिवशी दि १७ ऑगस्ट, १९८४ रोजी झाली. सर्व शासकीय अधिकाऱ्याप्रमाणे माझेही सर्व्हिस बुक तयार झाले होते. हे सेवेत आल्यापासून निवृत्त होईपर्यंतच्या सर्व नोंदीची डायरीच असते आणि त्यातील रेकॉर्ड कायदेशीर समजले जाते. त्या पुस्तकातील पहिल्याच पृष्ठावर वैयक्तिक माहिती असते आणि नावानंतर लगेचच जात नमूद करण्यासाठीचा मुद्दा असतो. मी तो रिक्त ठेवला होता कारण मी जात मानतच नव्हतो म्हणून जात नमूद करणे माझ्या प्रिन्सिपलमध्ये बसत नव्हते. पण संबंधित अवर सचिव मी जात नमूद करावी यावर ठाम होते, कारण १२/११/१९३५ च्या शासन निर्णयाप्रमाणे ते बंधनकारक होते. हे खरोखरच बंधनकारक होते का हा सुद्धा एक मुद्दा होताच पण शासनात नव्यानेच आलेल्या व्यक्तीला प्रस्थापित व्यवस्थेला तसे विचारने हि प्रथा नव्हती. त्या अवर सचिवांचे कायदेशीररित्या काही चुकत नव्हते आणि सामाजिकदृष्ट्या मी देखील चुकीचा नव्हतो. हे अवर सचिव अत्यंत सज्जन आणि मनमिळावू अधिकारी होते आणि त्यांनी मला सर्विसच्या सुरवातीसच शासन नियम मोडीत काढण्याचा आग्रह धरणे योग्य नाही म्हणून समजविण्याचा प्रयत्न करीत होते. ( सचिवातील ‘अवर’ हा शब्द इतर सर्व सामान्य नागरिकच काय पण खुद्द तमाम अवर सचिवांनी देखील स्वतःचे पद नमूद करण्यापलीकडे मराठीच्या इतिहासात कधीही इतरत्र वापरला गेल्याचे माझ्या अद्याप पाहण्यात आलेले नाही. किंवा त्याचा नेमका अर्थ काय हे देखील समजले नाही.)
असो , मी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. त्यांचा संयम सुटला आणि माझ्याविरुद्द कारवाई होऊ शकते अशा स्वरूपाचे वक्तव्य जर रागात येऊनच केले. बरीच वादावादी झाल्यानंतर ते मला त्यांचे वरिष्ठ म्हणजे उप सचिवांकडे घेऊन गेले. हे उप सचिव एक टिपिकल मंत्रालय रसायन होते. त्यांना अवर सचिवांनी माझा जात न नमूद कारण्याबाबाचा ‘अडेलतट्टूपणा’ सांगितला. उप सचिव चिडले. अर्थात त्यांच्या चिडण्यामध्ये मूळ वेगळेच कारण होते. मी इतर १९ इतर अधिकाऱ्यांबरोबर स्पर्धा परीक्षेतून डायरेक्ट्ली सहाय्यक सचिव या पदावर मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच (…एकमेव पहिली व शेवटचीच बॅच) सरळ सेवेने आलेलो होतो आणि इतक्या वरच्या पदावर मंत्रालयात नवीनच ‘पोरं’ आल्याने प्रचंड विरोध होता व त्या विरोधामध्ये हे उप सचिव अग्रभागी होते. आणखी एक मुद्दा … मंत्रालयात असे रसायन असलेल्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांचा एक अत्यंय शक्तिशाली जत्था असायचा आणि ते गृह , वित्त , महसूल , मदत व पुनर्वसन, नगर विकास या विभागातील सर्वात महत्वाच्या पदांवर मोनोपॉली म्हणून ३०-३५ वर्षे त्याच विभागात संपूर्ण काळ कार्यरत राहायचे. केवळ हेच नाही तर त्यांच्यामध्ये एक बेमालूमपणे तयार झालेले बॉन्डिंग इतके पक्के होते कि मुख्यमंत्री आणि मंत्री यांचावर पूर्ण प्रभाव असायचा. हा प्रभाव तीक्ष्ण करण्याचे हत्यार म्हणजे फाईलवर आणि आदेशांच्या प्रारूपात कमालीची क्लिष्टता आणून सोपा आणि कोणताही विषय समजण्यास प्रचंड अवघड करून ठेवायचा. शिवाय वर्षानुवर्षे एकाच विषयाबाबत काम करीत असल्याने त्यांच्या सर्व तोंडपाठ असायचे व कोणत्या जुन्या फाईलमध्ये काय आहे आणि महत्वाचे म्हणजे ती फाईल कोठे आहे ह्यावर पकड आल्याने सचिव किंवा मंत्री त्यांच्याकडे एक प्रशासनातील मौल्यवान ठेवा म्हणून पहात असत. हि मोनोपॉली त्यांच्या नियमित बदल्या करून कशी मोडीत काढली गेली त्यास मी एका तत्कालीन राज्यमंत्र्यांना श्रेय देतो. माझाही खारीचा वाटा होताच. अर्थात ह्या गोष्टीच मला सेवेच्या सुरवातीसच वैयक्तिक त्रास आणि मानहानी सहन करावी लागली होती पण समाधानही तितकेच मोठे होते. हे जरा विषयांतर झाले पण जरुरीचे होते.
आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे जातो.
जात विषयावर चर्चा सुरु झाली. चर्चा सुरु झाली.
उप सचिव: मी सुद्धा माझी जात नमूद केली आहे .
मी: ओ के
उप सचिव: जातीचा अभिमान पाहिजे.
मी : ओ के
उप सचिव: जात सांगण्यात लाज कसली ?
मी : पण मी जात मनातच नाही.
उप सचिव: मग आई वडिलांची लिहा.
मग मात्र मी देखील बरेच बोललो ते ‘सुनावले’ या सदरातील होते.
बरीच चर्चा झाल्यानंतर आमच्यात एक तोडगा म्हणून जरी जात नमूद केली नाही तरी धर्म नमूद करावा असा निर्णय उप सचिवांनी दिला. मी पुन्हा धर्म नोंदविण्याबाबत आक्षेप घेऊ लागलो तेंव्हा उप सचिवही भडकले. शेवटी मी ‘हिंदू’ अशी नोंद करण्याचे एका अटीवर मान्य केल ते म्हणजे मला जात किंवा धर्माची नोंद करावयाची नाही असे माझे निवेदन त्यांनी रेकॉर्डवर ठवावे. या पहिल्या प्रसंगाने पुढील अंतर्गत संघर्षांच्या शृंखलेस सुरवात झाली. पण एक, त्या अवर सचिवांनी अजिबात कटुता ठेवली नाही. तसे उप सचिवांबाबत मी बोलू शकत नाही.
कांही महिन्यांपूर्वी जुने रेकॉर्ड नष्ट करतांना सर्विस बुक सुद्धा आता तसे उपयोगाचे नाही म्हणून ते नष्ट करतांना माझे निवेदन त्यामध्ये अत्यंत विदीर्ण अवस्थेत मिळाले तेंव्हा पहिल्या संघर्षाच्या ‘वर्धापन’दिनी (😜) फेसबुकला ते अर्पण करून एका कागदाला स्वगृही पाठवून दिल्याची नोंद म्हणून आज ते येथे ……..
अशी क्लिष्टता नाही आणणार तो शासकीय अधिकारी च नसतो. त्यांनीच शासनाचे आणि राज्याचे वाटोळे करण्यात हातभार लावला आहे. अनुभव छान आहेत.लिहीत राहा
LikeLiked by 1 person