मानवी जीवन म्हणजे प्रवाह—अनुभवांचा, आकांक्षांचा, आणि निर्णयांचा अखंड प्रवाह. या प्रवाहात एखादा क्षण ‘शुभ’ असतो तर दुसरा ‘अशुभ’—अशी एक धारणा आपल्या समाजाने संस्कृतीच्या नावाखाली आत्मसात केलेली आहे. ‘मुहूर्त’ ही संकल्पनाही त्याच प्रवाहातील एक काल्पनिक वाटा आहे, जिच्यावर आजही अनेकांची श्रद्धा असून, व्यवहार, विवाह, घरप्रवेश, नवोदयाचे स्वप्न अशा अनेक महत्त्वाच्या घटनांची सुरुवात ‘मुहूर्ता’वरच केली जाते. परंतु, जेव्हा आपण विज्ञानाच्या निर्मळ प्रकाशात ही संकल्पना तपासून पाहतो, तेव्हा या विश्वासाचे बुडाशी उभे असलेले अंधश्रद्धेचे पाय मूळासकट ढासळताना दिसतात.
कशाला हवा मुहूर्त?
‘मुहूर्त’ म्हणजे काय? काही निवडक ग्रह-ताऱ्यांची स्थिती, तिथी, वार, नक्षत्र यांचा एक मिलाफ, ज्याला पुरोहित किंवा जोतिषी शुभ अथवा अशुभ म्हणतात. पण एक प्रश्न विचारावासा वाटतो—काय खरंच आकाशातील ग्रह आपल्या निर्णयांवर परिणाम घडवतात का? जर पृथ्वीवरील एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू करायचा ठरवले, आणि तोच ग्रहसंयोग आफ्रिकेतील एखाद्या अनोळखी गावातही तसाच असेल, तर तिथल्या व्यक्तीचंही जीवन त्याच मार्गाने चालेल काय?
या प्रश्नाचे उत्तर जर ‘हो’ असेल, तर विज्ञानाचे सारे सिद्धांत फोल ठरावेत. पण वस्तुस्थिती अशी नाही.
शास्त्र आणि अंधश्रद्धा: दोन टोकांची यात्रा
शास्त्र आपल्याला सांगते की ‘काळ’ (Time) हा एक सातत्याने प्रवाहित होणारा आयाम आहे, ज्यात कोणताही क्षण स्वतःहून ‘शुभ’ किंवा ‘अशुभ’ असू शकत नाही. कोणत्याही क्षणाचे मूल्य हे केवळ त्या क्षणी आपण केलेल्या कृतीने ठरते, त्या क्षणाची कोणतीही आकाशीय ‘गुणवत्ता’ नसते. उलट, एखादी संधी गमावण्यामागे मुहूर्ताच्या प्रतीक्षेचा मूर्खपणा कारणीभूत ठरतो, हेच शास्त्रीय दृष्टिकोन सूचित करतो.
इतिहासाचा आरसा: कुठे होते मुहूर्त?
इतिहासात डोकावून पाहा. अलेक्झांडरने मोहिमा काढताना ‘शुभ वेळ’ शोधला होता का? आल्बर्ट आइनस्टाइन किंवा आयझॅक न्यूटन यांनी आपली महान संशोधनयात्रा मुहूर्त पाहून आरंभ केली होती का? मुघल आक्रमक, ईस्ट इंडिया कंपनी, किंवा आपलेच स्वातंत्र्यवीर, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज इ नी कोणाचा इतिहास एखाद्या पंचांगाच्या पानावर ठरवलेला होता? त्यांनी वेळ निवडली नव्हती, वेळ घडवली होती.
यातून हे स्पष्ट होते की यशाची गुरुकिल्ली ही आकाशात नाही, ती मनात आणि कृतीत असते. महानता ही मुहूर्तावर नव्हे, तर निर्धारावर उभी राहते.
‘शुभ काळ’ हे व्यावसायिक तंत्र
कुठल्याही वस्तूला जर किंमत द्यायची असेल, तर ती दुर्मीळ ठरावी लागते. मुहूर्त सांगणाऱ्या जोतिषी यांनी सिद्धांताचा वापर केला. ही तत्कालीन सर्व जनतेला अत्यावश्यक अशी बाब निर्माण करून “सेवा” हा प्रोडक्ट तयार केला आणि त्याचे अव्याहतपणे आणि कोणत्याही जाहिरातीशिवाय त्याचा प्रसार आणि भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी वेद, ज्योतिष आणि ग्रंथ यांच्या साहाय्याने लोकांना पटवले की केवळ काही क्षणच शुभ असतात आणि उर्वरित सारे काळ अशुभ. त्यातून त्यांना एक हमखास अर्थार्जनाचा व्यवसाय तयार झाला जो वंशपरंपरागत पुढे चालू राहील आणि ग्राहकांची अजिबात वानवा भासणार नाही. या कल्पनेमुळे लोक संभ्रमित झाले. परिणामी, ‘शुभ काळ’ ओळखून सांगणारे एक संपूर्ण व्यावसायिक वर्ग उभा राहिला—पुरोहित, पंचांगकर्ते, जोतिषी इत्यादी.
ही सेवा म्हणजे एक प्रकारची अनिर्बंध ‘अंतःविक्रय व्यवस्था’ झाली. प्रत्येक विवाह, गृहप्रवेश, व्यवहार, खरेदी, अगदी केस कापण्यापासून नवजात बालकांच्या बारशापर्यंत—सर्व गोष्टींसाठी एखादा ‘शुभ वेळ’ सांगून शुल्क आकारले गेले. यामध्ये समाजातील भयग्रस्तता, अज्ञान आणि ‘देव रागावेल ’ अशा मानसिकतेने खूप मदत केली.
प्रगतीचा अडसर ठरलेली परंपरा
शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगभरात नाव कमावत असताना, समाजाच्या मानसिकतेत मात्र हा पुरातन विषारी अंकुर अजूनही ठाण मांडून बसलेला आहे. आपण ‘चंद्रयान’ चंद्रावर पाठवतो, पण ‘मुहूर्त पाहून रॉकेट उडवले का?’ असा प्रश्न आजही काही मंडळी विचारतात. एवढंच नव्हे, तर कित्येक शासकीय योजनांच्या उद्घाटनांसाठीही ‘मुहूर्त’ शोधला जातो, जणू काही वेळेचे चक्र कोणाच्या आज्ञेवर चालते.
खरे शुभ म्हणजे धैर्य आणि निर्णायक कृती
कुठलाही क्षण शुभ असतो का? हो, जर त्या क्षणी तुम्ही योग्य निर्णय घेऊन धैर्याने कृती केली, तर तो क्षण शुभ असतो. अन्यथा तोच क्षण भय, विलंब आणि शंकांनी भरलेला असतो. इतिहासातील महान वैज्ञानिक, लेखक, नेता किंवा योद्धा यांनी कधीही ‘मुहूर्त’ पाहून कृती केली नाही. त्यांनी वेळ घालवला नाही—वेळ घडवला!
काय करायला हवे?
आजच्या आधुनिक काळात शिक्षण, वैज्ञानिक जागृती आणि विवेकाचा सन्मान यांचा प्रसार करणं आवश्यक आहे. कोणताही तरुण किंवा तरुणी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना शुद्ध विचार, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांचा आधार घ्यावा, न की एखाद्या ज्योतिषांनी सांगितलेल्या मुहूर्ताची वाट पाहावी.
‘मुहूर्त’ ही संकल्पना म्हणजे एका समाजात पेरलेली, एक निरंतर चाललेली आणि हमखास खरेदीदार उपलब्ध होणारी व्यावसायिक संधी आहे, जी आजही अनेकांच्या अंधश्रद्धांवर पोसली जाते. या क्षणभंगुर कल्पनां आता तरी हद्दपार व्हायला हव्यात. आपण त्यांच्यावर वैज्ञानिक सत्याचा शिडकावा करायला हवा. कारण माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो, वेळेच्या सूचनेने नव्हे.
👍👍👍👍👍
👌👌👌👌👌
✅✅✅✅✅
LikeLike
परखड मत, सत्य आपण या लेखात नोंदवून वैचारिक दिशा दिली आहे. बादशाहने बिरबलाला विचारले , कोणते हत्यार उत्तम…? समोरून अंगावर हत्ती येतो आहे बिरबल बाजूनेच केकाटणारया कुत्र्याला हत्तीवर फेकले. वेळेत निर्णय घेण्यात शहाणपण, मुहुर्त पाहाण्यात नाही..
अभिनंदन सर खुप छान संवाद
LikeLiked by 1 person