फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एक आटपाट नगर होतं. त्या नगराचा कारभार बघण्यासाठी राजा आणि त्याचे अष्टप्रधान मंडळ होते. राजाने घेतलेले निर्णय राबविण्यासाठी अत्यंत प्रगल्भ सचिव कायमस्वरूपी नेमलेले होते. निर्णय घेणे आणि ते राबविणे यासाठी फाईल नावाच्या कागदपत्राचा जन्म झाला, असेहि काही किरकोळ इतिहासकार सांगतात. राजाने फर्मान काढले कि सर्व सचिवांनी सर्व फाईल्सचा निपटारा त्याच दिवशी करावा; म्हणजे सायंकाळी घरी जातांना टेबलावर एकही फाईल शिल्लक राहू नये. ( फाईलला “नस्ती” म्हणण्याचेही फर्मान निघाले. …. “नस्ती” हेच नाव का ठेवले ते कोणालाच माहित नव्हते. काही उपदव्यापी लोकांनि आवई उठवली कि नस्ती उठाठेव, नस्ती ब्याद , नस्त्या उचापती इ मधून नस्तीचा उगम झाला. असो ….आपल्याला काय त्याचे!)
नगराच्या अनेक सचिवांपैकी एक सचिव इतके अलौकिक कार्यक्षम होते कि त्यांना राजाचे फर्मान यःकश्चित वाटत असावे. त्यांच्या टेबलावर इतका मोठा फायलींचा ढिगारा असायचा कि ते खुर्चीवर बसलेले असतांना समोरच्या व्यक्तीला ते दिसायचेच नाहीत. त्यांची कामाची पद्धत इतकी वेगवान होती कि बुलेट ट्रेनला लाजवेल! उप किंवा दुय्यम अधिकाऱ्याला जर एखाद्या फाईलवर त्यांच्याकडून निर्णय पाहिजे असेल तर त्याने स्वतः जाऊन ती फाईल त्या ढिगाऱ्यामधून शोधून ती सचिवांपुढे ठेवणे हाच पर्याय होता.
“फाईलवर सही आवश्यक आहे” अशी विनंती त्या उप/दुय्य अधिकाऱ्याने केल्यावर, ढिगाऱ्यापलीकडून त्या सचिवांचा खोल गेलेला आवाज यायचा “…आजही चाहिए क्या”? मग ती फाईल का सही करून(निर्णय म्हणणे जर जास्तच होईल!) पाहिजे यावर उप/दुय्यम अधिकाऱ्याला आर्जव करावे लागे आणि त्यात तो यशस्वी झाला तर ती पहिली लढाई जिकल्यासारखे होते कारण मग त्या ढिगाऱ्यातून नेमकी फाईल शोधून काढणे हि दुसरी लढाई!!
“…अरे, तुमहि फाईल इसमेसे ढुंडो और इधर लाओ”. अशी पडत्या फळाची आज्ञा झाली कि मग तो उप/दुय्यम अधिकारी त्याच्या आणखी एका दुय्यमला बोलवून त्या फाईलीचे ढिगाऱ्याखालून उत्खनन व्हायायचे. प्रयत्नाअंती फाईल शोध मोहिमेला यश यायचे. मग मग ती फाईल त्या कार्यक्षम सचिवांपुढे सहीकरिता ढिगाऱ्यापालिकडे जाऊन त्यांच्यासमोर टेबलावर जेमतेम फाईल मावेल इतक्या शिल्लक असलेल्या जागेत ठेवण्याचा आटापिटा होताच. गरज हि शोधाची जननी असते असे म्हणतात. तसेच कांहीतरी याबाबतीतहि झाले. सचिव केबिनमध्ये नसतांना फाईल शोधून काढून सर्वात वर दिसेल अशा पद्धतीने ठेवण्याची जबाबदारी अति-दुय्यमावर सोपविली जायची आणि ढिगाऱ्यातून फाईल शोधण्यातील वेळ वाचविला जायचा!
मग त्या फाईलमध्ये विषय काय आहे, निर्णय काय पाहिजे अशा फालतू फंदात न पडता किंवा फाईल वाचण्याची तसदी न घेताच ते सचिव अत्यंत कार्यक्षमपणे सही करायचे….आणि सही करतांना “प्रशासन कसे गतिमान आणि आधुनिक” झाले पाहिजे हे त्यांचे प्रगल्भ विचार मांडायचे.
नंतर ते निवृत्त झाले……
………..विशेष पुढेच आहे. निवृत्तीनंतर ते शांत बसले नाहीत! त्यांनी एका आटपाट नगराला “प्रशासन कार्यक्षम कसे करावे” याबाबत अधिकृतपणे सल्ला देऊ लागले.
धन्य धन्य ते दोन्हीही आटपाटनगरे!!
साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
(हि एक कपोलकल्पित कथा आहे. जाणकारांना जर त्यात कांही सांप्रतकालीन संदर्भ लागला तर तो योगायोग समजावा.)
—महेश झगडे