ज्या क्षणी जगाचा सर्वसामान्य माणूस सकाळी उठतो, तेव्हा त्याच्या समोर दोन गोष्टी उभ्या असतात —
महागाईची भिंत आणि व्यवस्थेची थट्टा.
ज्या क्षणी तो कामावर जातो, त्याच्या श्रमातून निर्माण होणारे धन कुठे जाते?
ते जातं दावोसच्या बर्फाच्छादित पर्वतावर बसलेल्या आधुनिक राजे-राण्यांच्या तिजोरीत.
ज्या क्षणी तो कर भरतो, तो पैसा कुठे वापरला जातो?
लोककल्याणासाठी कमी — कॉर्पोरेट बेलआउटसाठी जास्त.
आणि दरवर्षी, याच व्यवस्थेचे आर्किटेक्ट्स — सूटबूट घातलेले नव-सरंजामदार — दावोसला जमतात.
हा कुठलाही “फोरम” नाही.
ही चर्चा नाही.
ही संवाद नाही.
हा समन्वय नाही.
हा आधुनिक साम्राज्यवादाचा दरबार आहे.
स्विस आल्प्समधील बर्फाखाली जणू जगाच्या लोकशाहीची कबर खणली गेली आहे, आणि त्या कबरीवर “World Economic Forum” नावाचा संगमरवरी थडगा उभा केला आहे.
WEF हे संयुक्त राष्ट्र नाही.
WEF हे WHO नाही.
WEF हे UNESCO नाही.
WEF हे IMF किंवा जागतिक बँक नाही.
WEF म्हणजे लोकशाहीविरुद्धचा कट.
WEF म्हणजे सार्वजनिक सत्तेचे खासगीकरण.
WEF म्हणजे जनतेच्या सार्वभौमत्वाची चोरी.
ही संस्था कुठल्या निवडणुकीतून आलेली नाही.
तिच्या सदस्यांना कुणी मतदान केलेले नाही.
तिच्या निर्णयांना कुठली संसदीय मंजुरी नाही.
तरीही — ही संस्था जग चालवते.
यालाच ते निर्लज्जपणे म्हणतात — “न्यू नॉर्मल.”
पण सत्य सांगायचे तर —
हा न्यू नॉर्मल नाही, हा ग्लोबल कटू डाव (Coup) आहे.
एक शांत, हसरा, सूट घातलेला, चकचकीत कू.
बंदुकीऐवजी बोर्डरूम.
लष्कराऐवजी लॉबी.
टँकऐवजी टेक कंपन्या.
लोकशाही टिकली आहे — पण फक्त रंगमंचावर.
पडद्यामागे सत्ता आहे — कॉर्पोरेट साम्राज्याची.
आजचा जगाचा नवा संविधान आहे:
- “तुम्ही मतदान करा.”
- “आम्ही शासन करू.”
अब्राहम लिंकनची लोकशाही आता इतिहासजमा झाली आहे.
आजची लोकशाही अशी आहे:
Of the one percent,
By the one percent,
For the one percent.
हा एक टक्का म्हणजे काय?
ते लोक जे:
- कर चुकवतात आणि नैतिकतेवर भाषण देतात.
- युद्धातून नफा कमावतात आणि शांततेवर परिषद घेतात.
- जंगल तोडतात आणि पर्यावरणावर भाष्य करतात.
- कामगारांना कंगाल करतात आणि “इन्क्लुजन”ची भाषा करतात.
ते स्वतःला “ग्लोबल लीडर्स” म्हणवतात.
प्रत्यक्षात ते ग्लोबल लुटारू आहेत.
आणि उरलेले ९९ टक्के?
ते लोक —
जे सकाळी उठतात, घाम गाळतात, कर भरतात, कर्ज फेडतात, आणि तरीही गरिब राहतात.
ते लोक —
जे प्रदूषण सहन करतात, पण हवामान बदलाचे परिणाम भोगतात.
ते लोक —
जे युद्धात मरतात, पण शस्त्र कंपन्या श्रीमंत होतात.
दावोसच्या जगात मानव हा मानव नाही —
तो संसाधन आहे.
नागरिक नाही —
ग्राहक आहे.
मतदार नाही —
डेटा आहे.
जीवन नाही —
नफा आहे.
या व्यवस्थेचा खरा चेहरा भयानक आहे.
हा असा जग आहे जिथे:
- आरोग्य हे हक्क नाही, बाजार आहे.
- शिक्षण हे अधिकार नाही, गुंतवणूक आहे.
- पाणी हे सार्वजनिक संपत्ती नाही, व्यापार आहे.
- हवा ही नैसर्गिक देणगी नाही, कार्बन क्रेडिट आहे.
आणि दावोसचे महंत या सर्वावर प्रवचन देतात.
तिथे ते “ग्रीन ट्रान्झिशन”वर बोलतात —
पण त्यांची जेट्स आकाशात धूर ओकतात.
ते “सस्टेनेबिलिटी”वर बोलतात —
पण त्यांच्या कंपन्या खाणी खोदतात, जंगल जाळतात, नद्या विषारी करतात.
ते “इक्वॅलिटी”वर बोलतात —
पण त्यांची संपत्ती दरवर्षी दुप्पट होते.
हे सगळं म्हणजे ढोंग नाही — हे जागतिक गुन्हेगारी आहे.
दावोस हे फोरम नाही —
ते ग्लोबल कार्टेल आहे.
दावोस हे चर्चा मंच नाही —
ते आर्थिक राजवाडा आहे.
दावोस हे लोकशाही नाही —
ते भांडवलशाहीची हुकूमशाही आहे.
या व्यवस्थेच्या तळाशी एक काळी, दुर्गंधीयुक्त नैतिक पोकळी आहे —
जी संपत्तीला देव मानते,
सत्तेला पूजा मानते,
आणि माणसाला वापराची वस्तू मानते.
हीच ती व्यवस्था जी —
एप्स्टीनसारख्या राक्षसांना संरक्षण देते,
अतिश्रीमंतांच्या विकृतींवर पडदा टाकते,
आणि सामान्य माणसाला कायम गुलाम ठेवते.
आता वेळ आली आहे —
सौम्य टीकेची नाही,
मवाळ सुधारांची नाही,
उपदेशांची नाही.
आता वेळ आली आहे —
वैचारिक बंड.
लोकशाही बळकटीकरण .
नागरिक जागृतीकरण.
जगाचे निर्णय दावोसच्या एसी रूममध्ये नव्हे —
तर रस्त्यावर, गावात, संसदेत, आणि जनतेच्या खुल्या मंचावर व्हायला हवेत.
आंतरराष्ट्रीय संस्था — UN, WHO, UNESCO — यांना पुन्हा बळ मिळायला हवे.
खासगी अब्जाधीशांनी नव्हे, तर सार्वभौम राष्ट्रांनी जग चालवायला हवे.
कॉर्पोरेशन्सने नव्हे, तर नागरिकांनी अजेंडा ठरवायला हवा.
हवामान संकट, आर्थिक विषमता, डिजिटल हुकूमशाही —
हे प्रश्न दावोसच्या क्लबमध्ये सोडून देणे म्हणजे जग आत्महत्येच्या दिशेने ढकलणे आहे.
दावोस हे जगाचे केंद्र नाही —
ते जगाच्या लोकशाहीचे ब्लॅक होल आहे.
जोपर्यंत हा ब्लॅक होल नष्ट होत नाही,
तोपर्यंत पृथ्वी मुक्त होणार नाही.
भविष्य हे —
अब्जाधीशांचे नाही, तर अब्जावधी लोकांचे असले पाहिजे.
खासगी पैशांचे नाही, तर सार्वजनिक हिताचे असले पाहिजे.
कॉर्पोरेट राजवटीचे नाही, तर लोकशाही क्रांतीचे असले पाहिजे.
आणि जोपर्यंत ते घडत नाही —
दावोस हे राहील:
एक सोन्याने मढवलेले तुरुंग,
एक बर्फाखाली लपलेले स्मशान,
आणि मानवतेच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नावर उभा असलेला भव्य थडगे.
-महेश झगडे