डावोस, GDP आणि शेतकरी : जगाच्या जेवणाची चव, पण माणसाची किंमत शून्य!

डावोसचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पाहिला की एक प्रश्न पडतो—
जग चालते कशावर?
आकड्यांवर की अन्नावर?

डावोसच्या मते जग GDPवर चालते.
शेतकऱ्याच्या मते जग भाकरीवर चालते.

पण दुर्दैव असे की डावोसच्या टेबलावर भाकरी येते—शेतकरी येत नाही.

जगातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. भारतात तर ही टक्केवारी आणखी ठळक. पंजाबपासून विदर्भापर्यंत, गंगेच्या खोऱ्यापासून मराठवाड्याच्या दुष्काळी जमिनीपर्यंत—हा देश अजूनही शेतकऱ्याच्या घामावर उभा आहे. पण डावोसच्या मोजपट्टीत हा घाम अर्थव्यवस्था ठरत नाही.

कारण शेतीचा GDP मधील जागतिक वाटा फक्त ४.७ टक्के आहे.

अर्थातच!
जिथे शेतकऱ्याची आत्महत्या ही “डेटा पॉईंट” असते, तिथे त्याचे जगणे कोण मोजणार?

डावोसच्या बर्फाळ सभागृहात बसलेले महाशय ‘फ्युचर ऑफ फूड’वर चर्चा करतात—
शेतकरी न बोलावता.
‘सस्टेनेबल अ‍ॅग्रिकल्चर’वर भाषणं होतात—
शेतकऱ्याला ऐकू न देता.
‘क्लायमेट चेंज’वर स्लाईड्स दाखवल्या जातात—
पावसावर जगणाऱ्याला खोलीबाहेर ठेवून.

ही उपरोधाची परिसीमा नाही—हा जागतिक विनोदाचा शवविच्छेदन आहे.

डावोससाठी भारतीय शेतकरी म्हणजे काय?
एक आकडा.
एक समस्या.
एक ओझं.
आणि कधीकधी—एक अनुदानावर जगणारा “अकार्यक्षम घटक”.

पण डावोसच्या पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासामागे
शेतकऱ्याचा घाम आहे,
कर्ज आहे,
आणि अनेकदा—एक न लिहिलेली चिठ्ठी आहे.

डावोसला  शेतकऱ्याची भाषा कळत नाही.
कारण तो डेरिव्हेटिव्ह्ज बोलत नाही.
तो ब्लॉकचेनवर शेती करत नाही.
तो स्टार्टअप म्हणून जन्मत नाही.

तो पावसाची वाट पाहतो.
तो सावकाराची दारं झिजवतो.
तो सरकारकडे आशेने पाहतो.
आणि शेवटी……तो आकड्यात बदलतो.

मग डावोस म्हणतो: “शेती ही अर्थव्यवस्था नाही.”

खरंच?
मग तुमच्या प्लेटमधली भाकरी कोणत्या स्टॉक एक्स्चेंजवरून आली?

मी यापूर्वीच डावोसच्या आयोजकांना पत्र लिहिले. मला माहीत आहे….ते पत्र त्यांच्या कानावर पडणार नाही. कारण स्विस आल्प्समध्ये बसून विदर्भाचा दुष्काळ दिसत नाही. तिथे मराठवाड्याची कोरडी जमीन स्लाईडमध्ये बसत नाही. तिथे पंजाबचा आंदोलक शेतकरी “मार्केट डिस्टॉर्शन” ठरतो.

माझे पत्र त्यांना बदलण्यासाठी नव्हते.
ते स्वतःला माणूस असल्याची आठवण करून देण्यासाठी होते.

डावोस शेतीकडे दुर्लक्ष करत नाही—तो तिला पायरीखाली ठेवतो. कारण शेती म्हणजे स्वायत्तता, अन्नसुरक्षा, लोकशाहीचा पाया. आणि डावोसला पाया नको—त्याला मनोरे हवेत. काचेतले, कॉर्पोरेट मनोरे.

डावोस मानवतेचे भविष्य ठरवत नाही.
तो भांडवलाला मानवतेपेक्षा मोठे ठरवतो.

जोपर्यंत शेतकऱ्यांची घाम ‘अर्थव्यवस्था’ ठरत नाही,
जोपर्यंत अन्न उत्पादनाला उद्योगापेक्षा दुय्यम मानले जाते,
जोपर्यंत आत्महत्या आकडा आणि शेअर भाव बातमी ठरतो—

तोपर्यंत डावोस हा जागतिक विकासाचा मंच नाही,
तर जगाच्या उपासमारीवर उभा असलेला आलिशान उपहास आहे.

माझे पत्र कदाचित कुणी वाचणार नाही.
पण गप्प बसणे म्हणजे
विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या शांततेला संमती देणे असते.

आणि ही संमती
माझ्या मते
एकदिवसीय सर्वांना अतिशय महाग पडेल, फार महाग………

-महेश झगडे 

Standard

Leave a comment