नागपंचमी : नागाच्या फणीपलीकडची एक आठवण

आज नागपंचमी.

श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस. भारताच्या अनेक भागांत आज नागाची पूजा केली जाते. कुठे वारुळाची पूजा होते, कुठे नागाची प्रतिमा पूजली जाते, तर कुठे प्रत्यक्ष सर्पालाच देवत्व बहाल केले जाते. आपल्या धार्मिक-सांस्कृतिक स्मृतीत नाग इतका खोलवर रुजलेला आहे की शिवाच्या गळ्यातील नागापासून कृष्णाच्या कालियामर्दनापर्यंत असंख्य पुराणकथा त्याच्याभोवती विणल्या गेल्या आहेत.

परंतु नागपंचमी आली की माझ्या मनात सर्वप्रथम यांपैकी कोणतीही कथा येत नाही. मला आठवते मध्य प्रदेशातील सातपुड्याच्या जंगलातली एक दरी. आणि त्या दरीत भेटलेला एक नाग. पण त्याहीपेक्षा मला आठवतात तिथली माणसे—ज्यांनी मला ‘नाग’ या शब्दाचा एक वेगळाच अर्थ सांगितला होता.

ही गोष्ट सुमारे दोन दशकांपूर्वीची. मध्य प्रदेश विधानसभेच्या एका निवडणुकीत माझी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. मला तत्कालीन होशंगाबाद जिल्ह्यातील—आजच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील—पिपरिया विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. पिपरिया म्हटले की त्याच्या जवळच सातपुड्याच्या कुशीत वसलेले पचमढी हे थंड हवेचे ठिकाण येते.

निवडणूक निरीक्षकाचे काम वरकरणी मतदानाच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे असले, तरी माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी होती. जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा निवडणूक यंत्रणा जिथे सहज पोहोचते, तिथे निरीक्षकाने जाऊन सर्व काही व्यवस्थित असल्याचे पाहण्यात मला फारसा अर्थ वाटत नसे. मला उलट अशा ठिकाणी जायचे असे, जिथे वरिष्ठ अधिकारी सहसा पोहोचत नाहीत. व्यवस्थेची खरी परीक्षा मुख्य रस्त्यावर होत नाही. ती शेवटच्या मैलावर होते. आणि लोकशाहीचीसुद्धा.

राष्ट्रपतींच्या खोलीतला मुक्काम

त्या दौऱ्यात काही काळ माझा मुक्काम पचमढीच्या शासकीय विश्रामगृहात होता. तेथे मला दिलेली खोली विशेष होती. मला सांगण्यात आले की भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पचमढीला आले असताना त्यांच्या वास्तव्यासाठी ती विशेषकरून निर्माण करण्यात आली होती. आजच्या तथाकथित ‘व्हीआयपी सुइट’च्या कल्पनेशी तिचे काहीच साम्य नव्हते. भपकेबाज सजावट नव्हती. झगमगाट नव्हता. आधुनिक सुखसोयींची रेलचेल नव्हती. एक साधी खोली, छोटासा हॉल आणि त्या जागेत भरून राहिलेला एका वेगळ्या काळाचा साधेपणा. मी अनेकदा विचार करीत असे—देशाचा पहिला राष्ट्रपती ज्या खोलीत राहिला, त्या खोलीत आज निवडणूक आयोगाचा एक निरीक्षक म्हणून मी राहत आहे. पदे बदलतात, व्यक्ती बदलतात; पण भारतीय राज्यव्यवस्थेचा प्रवाह या इमारतींच्या भिंतींतून पुढे वाहत राहतो.

निवडणुकीच्या काळात शासकीय विश्रामगृहांवर निवडणूक यंत्रणेचे नियंत्रण असल्याने एरवी राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांच्यासाठी राखून ठेवली जाणारी व्यवस्था निरीक्षकांना उपलब्ध होत असे. त्या योगायोगामुळे मला ती खोली मिळाली होती.

परंतु त्या मुक्कामाची माझ्या स्मरणात राहिलेली सर्वांत सुंदर गोष्ट खोली नव्हती. संध्याकाळ झाली की मी विश्रामगृहाबाहेरच्या एका उंच जागेवर जाऊन बसत असे. पश्चिमेला सातपुड्याच्या डोंगरांच्या एकामागून एक रांगा दिसत. सूर्य त्या रांगांमागे हळूहळू उतरत असे. प्रकाशाचा रंग बदलत जाई. प्रथम सोनेरी, मग केशरी, नंतर तांबूस आणि अखेरीस जांभळ्या सावल्यांमध्ये सगळे डोंगर विरघळून जात. अखिल भारतीय प्रशासकीय- आयएएस सेवेतील अधिकाऱ्याला मिळणाऱ्या काही अदृश्य विशेषाधिकारांपैकी हा एक असावा, असे मला तेव्हा वाटत असे. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत कामासाठी जावे लागते; त्याबदल्यात भारत आपली अशी काही रूपे दाखवतो, जी पर्यटक म्हणून कदाचित कधीच दिसली नसती.

पण त्या रम्य सूर्यास्ताच्या पलीकडे एक दुसरे जग होते. ते पाहण्यासाठी डोंगर उतरावा लागणार होता.

“सर, तिथे जाण्याची गरज नाही.”

मतदान केंद्रांची यादी पाहताना माझे लक्ष एका अत्यंत दुर्गम केंद्राकडे गेले. मी सोबतच्या स्थानिक अधिकाऱ्याला विचारले,

“हे मतदान केंद्र कुठे आहे?”

त्याने जागा सांगितली. पचमढीच्या डोंगररांगांच्या खाली, जंगलाच्या आत, खोल भागात.

“मला तिथे जायचे आहे.”

त्याच्या चेहऱ्यावर लगेच अस्वस्थता उमटली.

“सर, तिथे जाण्याची आवश्यकता नाही. तेथे मतदानाची सर्व व्यवस्था झालेली आहे.”

“व्यवस्था झालेली आहे की नाही, तेच तर पाहायला जायचे आहे.”

तो काही क्षण शांत राहिला.

“रस्ता खूप कठीण आहे, सर. आधी बराच प्रवास गाडीने करावा लागेल. नंतर रस्ता संपतो. पुढे मोटरसायकलने जावे लागेल. त्यानंतर मोटरसायकलही जाऊ शकत नाही. मग जंगलातून पायी जावे लागेल.”

“किती?”

त्याने सांगितलेला आकडा साधारण सतरा किलोमीटरचा होता.

त्या दिवशी बराच उशीर झाला होता.

“ठीक आहे,” मी म्हणालो, “आज नको. उद्या सकाळी लवकर निघू.”

त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की माझ्या उत्तराने त्याची समस्या सुटली नव्हती; उलट ती उद्यापर्यंत पुढे ढकलली गेली होती.

रस्ता संपला, प्रवास सुरू झाला

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. काही अंतरापर्यंत वाहने गेली. नंतर जंगल दाट होत गेले. रस्ता अरुंद झाला. आणि एका ठिकाणी तो अक्षरशः संपला. पुढे नदी होती. पूल नव्हता. पाण्यात उतरूनच ती पार करावी लागणार होती. आम्ही गुडघाभर पाण्यात उतरलो. कागदपत्रे, शस्त्रे आणि आवश्यक साहित्य सांभाळत दुसऱ्या तीरावर पोहोचलो. तिथे दोन मोटरसायकली आमची वाट पाहत होत्या. मी एका मोटरसायकलीचा ताबा स्वतः घेतला. माझा अंगरक्षक मागे बसला. दुसऱ्या मोटरसायकलवर तहसीलदार आणि त्याचा सहकारी. आम्ही जंगलात शिरलो. दोन्ही बाजूंनी उंच झाडे. जमिनीवर ओलसर पालापाचोळा. मध्येच चिखल. मानवी वस्तीचे चिन्ह जवळजवळ नाही. मोटरसायकलींचा आवाज त्या जंगलाच्या नैसर्गिक शांततेत एखाद्या अनाहूत घुसखोरासारखा वाटत होता. आणि तेव्हाच तो दिसला.

जंगलाचा खरा मालक आमच्या पुढून एक प्रचंड साप जात होता. त्याचा आकार इतका प्रभावी होता की आम्ही आपोआप वेग कमी केला. मोटरसायकलींचा आवाज ऐकून तो थांबला. क्षणभरात त्याने डोक्यासहीत शरीराचा पुढचा भाग वर उचलला, फणा पसरलाआणि डौलदारपणे एखाद्या राजपुत्राच्या आविर्भावात आमच्याकडे वळून पाहू लागला. त्या क्षणी भीतीपेक्षा मला त्याच्या व्यक्तिमत्त्वाची—होय, व्यक्तिमत्त्वाचीच—भव्यता जाणवली. जंगलाच्या मध्यभागी आम्ही सरकारी अधिकारी, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी, पोलीस, तहसीलदार—या सगळ्या पदव्या अचानक निरर्थक झाल्या होत्या.

त्या भूमीचा खरा अधिपती आमच्यासमोर फणा काढून उभा होता. जणू त्याच्या नजरेत एकच प्रश्न होता—

माझ्याप्रदेशातघुसणारेहेकोण?”

आम्ही थांबलो. तोही थांबला. काही क्षण आमच्याकडे पाहत राहिला. नंतर, जणू आमची उपस्थिती फारशी महत्त्वाची नाही असा निर्णय घेऊन, त्याने फणा खाली घेतला आणि जंगलात नाहीसा झाला.

सूर्य जिथे उशिरा पोहोचत होता

पुढचा प्रवास आणखी कठीण होता. मोटरसायकली एका ठिकाणी सोडाव्या लागल्या आणि पुढे पायी चालू लागलो. अखेर आम्ही त्या वस्तीपर्यंत पोहोचलो तेव्हा साधारण साडेअकरा-बारा वाजले असावेत.पण तिथे दुपार झाल्यासारखे वाटत नव्हते, संध्याकाळ असण्याचा भास होत होता. डोंगरांच्या खोल घडीत वसलेल्या त्या ठिकाणी सूर्यकिरण सहज पोहोचत नसावेत. सभोवतालच्या उंच कड्यांनी आणि जंगलाने प्रकाशच जणू अडवून धरला होता.

‘गाव’ म्हणावे अशीही ती वस्ती नव्हती.

काही अत्यंत साध्या झोपड्या. एकामागोमाग एक. नीट रस्ता नाही. बाजार नाही. आपण ज्याला गावाची रचना म्हणतो, तिचेही स्पष्ट स्वरूप नाही. आणि ही घटना स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सहा दशकांनी घडत होती. दिल्लीमध्ये भारत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत होता. इथे मात्र एकविसावे शतक अजून डोंगर उतरून खाली पोहोचलेले नव्हते.

चार बांबूंचे मतदान केंद्र

मला अर्थातच मतदान केंद्र पाहायचे होते.

“कुठे आहे बूथ?” मी विचारले.

अधिकाऱ्याने एका दिशेला बोट दाखवले. मी पाहिले आणि क्षणभर मला वाटले की माझी काहीतरी चूक होत आहे. चार-पाच बांबू जमिनीत रोवलेले होते. त्यावर ताजी पाने आणि फांद्या टाकून सावलीसारखी रचना तयार केली होती. बस्स. तेच मतदान केंद्र. मी अवाक् झालो.

“इथे मतदान होणार?”

“हो, सर.”

पहिली प्रतिक्रिया प्रशासकीय संतापाची होती. मतदान केंद्रासाठी असणाऱ्या निकषांचे काय? मतदारांच्या गोपनीयतेचे काय? मतदान कर्मचाऱ्यांचे काय? साहित्याचे काय? सुरक्षा?

पण पुढच्याच क्षणी दुसरा विचार मनात आला. या ठिकाणी आणणार तरी काय आणि कसे? रस्ता नाही. वाहन पोहोचत नाही. इमारत नाही. उपलब्ध साधने म्हणजे जंगल, बांबू, पाने आणि माणसांची इच्छाशक्ती. त्या चार बांबूंकडे मी पुन्हा पाहिले. क्षणापूर्वी ते मला प्रशासनाच्या अपयशाचे प्रतीक वाटले होते. आता तेच मला भारतीय लोकशाहीच्या हट्टाचे प्रतीक वाटू लागले. देशातील सर्वांत दुर्गम नागरिकापर्यंत मतपेटी—नंतर मतदान यंत्र—पोहोचवायचेच. मतदार मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नसेल, तर लोकशाही त्याच्यापर्यंत चालत जाईल. रस्ता संपला तर मोटरसायकलवर जाईल. मोटरसायकल थांबली तर पायी जाईल. इमारत नसेल तर चार बांबू रोवेल. पण मतदान घेईल. त्या चार बांबूंच्या मंडपात मला भारतीय लोकशाहीची एखाद्या संसदभवनापेक्षाही प्रभावी प्रतिमा दिसली.

शिलाजित आणि दारिद्र्य

मी तिथल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. भाषेचा अडथळा मोठा होता. आमच्यासोबत असलेल्या स्थानिक महसूल कर्मचाऱ्यालाही त्यांची बोली पूर्णपणे समजत नव्हती.मी विचारले,

“हे लोक करतात काय?”

मला सांगण्यात आले की जंगलातील औषधी वनस्पती, खडकांमधून मिळणारे पदार्थ आणि विशेषतः शिलाजितसारखे पदार्थ गोळा करून ते व्यापाऱ्यांना विकतात. त्यांना मिळणारी किंमत अत्यल्प; पण पुढे बाजारात त्याच वस्तूंवर व्यापारी मोठा नफा कमावतात. निसर्गसंपत्ती त्यांच्या भोवती होती. पण संपन्नता त्यांच्याकडे नव्हती. ही विसंगती भारताच्या आदिवासी प्रदेशांची जुनी शोकांतिका आहे—संपत्ती जमिनीखाली, जंगलात आणि डोंगरात; दारिद्र्य मात्र त्या संपत्तीच्या मालकाच्या झोपडीत. दुपारही झाली नव्हती आणि अनेक पुरुष मद्यधुंद अवस्थेत दिसत होते. एका वृद्ध स्त्रीशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. तिचे वय सत्तरच्या आसपास असावे.

“तिच्याशी बोलू या,” मी अधिकाऱ्याला म्हटले.

तो थोडा हसला.

“सर, ती त्यांच्यापेक्षाही जास्त प्यायलेली आहे.”

त्या वाक्यावर हसावे की अस्वस्थ व्हावे, हेच मला समजले नाही.

दारू ही त्या लोकांची समस्या होती की त्यांच्या असहायतेवर लावलेली भूल—हा प्रश्न माझ्या मनात राहिला.

“आम्ही नाग आहोत”

नंतरच्या संवादात मात्र मला एक विलक्षण गोष्ट सांगण्यात आली. त्यांची भाषा आम्हाला पूर्णपणे कळत नव्हती. स्थानिक कर्मचारी त्यांचे बोलणे मला समजावून सांगत होता.

त्यातून मला असे सांगण्यात आले—

“हे लोक स्वतःला नाग किंवा नागवंशी मानतात.”

मी थबकलो.

नाग?

सकाळी जंगलात भेटलेला फणा काढलेला नाग माझ्या डोळ्यांसमोर आला. पण ते सर्पाबद्दल बोलत नव्हते. ते स्वतःबद्दल बोलत होते. स्थानिकांनी सांगितलेल्या मौखिक परंपरेनुसार, अतिप्राचीन काळी बाहेरून आलेल्या समूहांनी त्यांच्या समाजातील स्त्रियांना जबरदस्तीने पळवून नेऊन विवाह केले. मात्र त्या स्त्रियांचा त्यांच्या मूळ कुटुंबाशी असलेला संबंध पूर्णपणे तोडला गेला नाही. वर्षातून एका विशिष्ट दिवशी त्या स्त्रियांनी आपल्या माहेरी—आपल्या ‘नाग’ बांधवांकडे—परत यावे, अशी परंपरा राहिली.

तो दिवस कोणता? श्रावणातील पंचमी. नागपंचमी.

मी पुन्हा विचारले.

“म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणे या कथेतला ‘नाग’ हा साप नाही?”

“नाही, सर. नाग म्हणजे त्यांचे लोक. त्यांचे बांधव.”

त्या दुर्गम दरीत उभा राहून मी काही क्षण स्तब्ध झालो. कारण माझ्यासमोर नागपंचमीची एक सर्वस्वी वेगळी खिडकी उघडली होती.

इतिहास, लोकस्मृती आणि सावधगिरी

आज इतक्या वर्षांनंतर या आठवणीची नोंद करताना एक गोष्ट स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. त्या दिवशी मला सांगण्यात आलेली कथा ही त्या परिसरातील लोकांकडून आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून मला समजलेली मौखिक परंपरा होती. तीच नागपंचमीची ऐतिहासिक उत्पत्ती आहे, असा निष्कर्ष काढण्यासाठी माझ्याकडे तेव्हा पुरावा नव्हता आणि आजही तसा निर्णायक पुरावा माझ्या पाहण्यात नाही. परंतु त्यामुळे त्या अनुभवाचे महत्त्व कमी होत नाही. कारण नंतर उपलब्ध झालेल्या मानववंशशास्त्रीय अभ्यासांत पचमढी जैवमंडलातील काही गोंड कुळे स्वतःला ‘नागवंशी’ मानतात, अशी नोंद आढळते. त्यांच्यात नाग न मारण्याची आणि नागपंचमीला नागपूजा करण्याची परंपराही नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, या सर्पपूजेचे मूळ किती प्राचीन आहे आणि ती त्यांच्या मूळ नागवंशी अस्मितेचा भाग होती की नंतरच्या हिंदू धार्मिक प्रभावातून तिचे स्वरूप बदलले, याबाबत स्थानिक परंपरांमध्येच संदिग्धता असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

म्हणजे त्या दिवशी मला जंगलात जे ऐकायला मिळाले होते, त्याचा प्रत्येक तपशील इतिहास म्हणून सिद्ध होत नसला, तरी ‘नाग’ हा शब्द केवळ सरपटणाऱ्या प्राण्यापुरता मर्यादित नव्हता, याकडे दुर्लक्षही करता येत नाही.

इतिहास नेहमी राजांच्या शिलालेखांतच टिकून राहत नाही. कधी तो एखाद्या दरीतल्या वृद्ध स्त्रीच्या स्मृतीत राहतो. कधी एखाद्या कुळाच्या नावात. कधी एखाद्या सणाच्या विधीत. आणि कधी मूळ अर्थ विसरला गेल्यानंतर त्या अर्थावर चढलेल्या नव्या पुराणकथांच्या थराखाली. मौखिक परंपरा म्हणजे पुरावा नव्हे; पण ती संशोधनाला विचारलेला प्रश्न नक्कीच असते. त्या दिवशी सातपुड्याच्या दरीने माझ्या मनात तो प्रश्न कायमचा ठेवला.

एकाच दिवसाचे दोन नाग

त्या प्रवासात मला दोन ‘नाग’ भेटले होते. पहिला जंगलात. भव्य फणा उभारून आमच्याकडे पाहणारा जिवंत नाग. आणि दुसरा त्या दरीत. स्वतःची ओळख ‘नाग’ किंवा ‘नागवंशी’ परंपरेशी जोडणारा माणूस.

पहिल्याला कोणत्याही पुराणकथेची गरज नव्हती. तो उत्क्रांतीने घडवलेला, आपल्या अधिवासात जगणारा एक विलक्षण सुंदर प्राणी होता. दुसऱ्यालाही देवत्वाची गरज नव्हती. तो हजारो वर्षांच्या मानवी स्थलांतरांचा, समूहांच्या संघर्षांचा, विवाहांचा, सांस्कृतिक संमिश्रणाचा आणि लोकस्मृतीचा वाहक असू शकतो. कदाचित म्हणूनच त्या दिवसानंतर नागपंचमीकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. सणाच्या पुराणकथा मला माहीत होत्या. त्या दिवशी मला त्यामागे दडलेली माणसे दिसली.

आणि चार बांबूंवर उभी असलेली लोकशाही

परंतु त्या दिवसाची सर्वांत मोठी आठवण नागपंचमीचीही नाही. ती त्या चार बांबूंची आहे. भारताच्या एका अतिदुर्गम दरीत काही माणसे राहत होती. त्यांच्याकडे रस्ता नव्हता. चांगली घरे नव्हती. आरोग्यसेवा पोहोचली होती की नाही याची शंका होती. त्यांच्या जंगलसंपत्तीचे मूल्य दुसरेच लोक कमवत होते. त्यांची भाषा सरकारी अधिकाऱ्यालाही नीट समजत नव्हती. स्वातंत्र्याला जवळजवळ सहा दशके उलटून गेल्यानंतरही भारतीय विकासव्यवस्था त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचली नव्हती. पण एक गोष्ट पोहोचली होती. मतदानाचा अधिकार. त्यांच्यासाठी चार बांबू रोवले गेले होते. वर पाने टाकली होती. आणि त्या हिरव्या छपराखाली भारताचे संविधान त्या दिवशी त्यांची वाट पाहणार होते. हा विरोधाभास मला आजही अस्वस्थ करतो. राज्य त्यांना रस्ता देऊ शकले नव्हते; पण मत देण्याचा अधिकार घेऊन त्यांच्या दाराशी पोहोचले होते. ते पुरेसे नव्हते. पण ते क्षुल्लकही नव्हते. लोकशाहीचा विजय केवळ संसदेत सत्तांतर झाले की होत नाही. ती खरी जिंकते तेव्हा, जेव्हा एका अज्ञात दरीतील एका अज्ञात नागरिकाचे मत घेण्यासाठी सरकारी कर्मचारी नदी ओलांडतो, मोटरसायकल चालवतो, जंगल तुडवतो, अनेक किलोमीटर पायी चालतो आणि शेवटी इमारत नसल्यामुळे चार बांबू रोवून मतदान केंद्र उभे करतो.

त्या दिवशी मला भारतीय लोकशाहीची एकाच वेळी दोन रूपे दिसली.

तिचे अपयश—कारण विकास तिथे पोहोचला नव्हता.

आणि तिचे असामान्य यश—कारण मतपेटी पोहोचली होती.

आज नागपंचमी आहे. लोक नागाची पूजा करतील. पुराणकथा सांगतील. नागदेवतेच्या प्रतिमेसमोर हात जोडतील. माझ्या डोळ्यांसमोर मात्र सातपुड्याचे ते जंगल उभे राहते. मोटरसायकलसमोर फणा उभारून काही क्षण आमच्याकडे पाहणारा तो राजबिंडा नाग आठवतो. डोंगरांच्या सावलीत लपलेली ती वस्ती आठवते. स्वतःला नागवंशी म्हणवणाऱ्या त्या माणसांची मौखिक कथा आठवते.

आणि सर्वांत शेवटी—

चार बांबू.

त्यावर पसरलेली हिरवी पाने.

आणि त्यांच्या सावलीत उभे असलेले जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे एक छोटेसे मतदान केंद्र.

त्या दिवशी मी निवडणूक निरीक्षक म्हणून तिथे गेलो होतो.

परत आलो, तेव्हा माझ्याजवळ निरीक्षणापेक्षा मोठी गोष्ट होती—

एका सणामागे दडलेल्या लोकस्मृतीचा प्रश्न आणि चार बांबूंवरही उभी राहू शकणाऱ्या भारतीय लोकशाहीवरचा विश्वास.

-महेश झगडे

Standard

One thought on “नागपंचमी : नागाच्या फणीपलीकडची एक आठवण

Leave a comment