पेशंट-केअर” धोरणाकडून “आरोग्य” धोरणाकडे.

( मा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दि १७.६.२०२१ रोजी लिहिले पत्र.)

दि 17/06/2021

प्रति,

मा. मुख्यमंत्री

महाराष्ट्र शासन,

मंत्रालय, मुंबई. `

विषय: “पेशंट-केअर” धोरणाकडून “आरोग्य” धोरणाकडे.

सन्माननीय महोदय,

कोरोना साथीने गेले वर्षभर जो जगभर धुमाकूळ घातलेला आहे तो सर्व जण अनुभवत आहोतच. अर्थात, गेल्या दोनशे वर्षांमध्ये जी शास्त्रीय संशोधनाची प्रगती झाली व त्यामधून इतर गोष्टींबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात देखील मोलाची कामगिरी राहिल्यामुळे भारताचे सरासरी आयुष्यमान स्वातंत्र्यापूर्वी ३२-३४ वर्षे होते, ते आता एकूण ६९ वर्षे झाले आहे. औषधांचे शोध, औषध निर्मिती कारखाने, अँटिबायोटिक्स, औषधांची मुबलक उपलब्धता, सरकारी आणि खासगी इस्पितळे आणि दवाखाने, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रचंड वाढी यामुळे देशात दर हजार लोकसंख्येमागे डॉक्टरांची वाढलेली उपलब्धता, स्थानिक पातळीपर्यंत शासकीय आणि निमशासकीय आरोग्य यंत्रणेचे पसरलेले जाळे व त्यासाठी मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रकातून निधीची तरतूद इत्यादींबाबतच्या “रुग्णांवर उपचार” करणे हा मूळ गाभा असलेल्या धोरणांचा अवलंब या देशाने गेली सत्तर वर्षे अव्याहतपणे केला आहे. अर्थात, असे भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सर्वत्र अशीच आरोग्याची धोरणे असल्याचे वारे गेल्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वाहू लागले. त्यामध्ये मग साहाजिकच भांडवलशाहीवर आधारित व्यापाराची संधी म्हणून पण या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुरू झाला आणि त्या व्यापारीकरणाने हे आरोग्य क्षेत्र कधी काबीज केले ते कोणाच्याही लक्षात आले नाही. या व्यापारीकरणाचा पुढचा अध्याय म्हणून मग आरोग्य विमा सुरू झाला आणि आता तर हा सर्वच खेळ त्या दिशेने जगभर केंद्रित होऊ लागला व त्यास भारत कसा द राहू शकेल? पाश्चात्त्य देशांचे अनुकरण हे ठीक; पण आपण अंधानुकरणामध्येही मागे नाही, ही आपली ओळख झाली.

हे आता चर्चेत घेण्याचे कारण म्हणजे आरोग्य क्षेत्रात इतकी देदीप्यमान प्रगती होऊन लाखो लोक करोना महामारीत का मृत्यू पावले? लोकांना हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून का भरती व्हावे लागले? जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्यापर्यंत का परिस्थिति चिघळली ? रोजगार बुडून जगण्याची भ्रांत निर्माण होण्यासारखे परिस्थिती का उद्भवली? याची उत्तरे शोधावी लागतील.

मानवाने गेल्या दोनशे वर्षांत जी प्रगती केली आहे आणि जीवन अधिकाधिक सुखकर करण्याकरिता ज्या सुविधा निर्माण केल्या आहेत, ते सर्व मानवाचा एकत्रितपणे काम करण्याची क्षमता याचा परिपाक आहे. हे एकत्रीकरण इतके झाले आहे की त्याच्या चांगल्या परिणामांबरोबरच दुष्परिणामदेखील वाढले आहेत. हे दुष्परिणाम शोधून त्या बाबतीत सर्व जगानेच पुन्हा एकदा जगण्याकरिता काही मूळ संकल्पना आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

कोरोनाने जगाला खरे तर आतापर्यंत मानवाने चांगले काय केले आणि तो कुठे चुकला, याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करून त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी दिलेली आहे. ही संधी जर दुर्लक्षित केली तर मानवासारखा हुशार; पण तितकाच अभागी प्राणी मानवच राहील. हा विषय far मोठा आहे, त्यावर व्यापक मंथन आणि विशेषतः कोरोनासारखी भयंकर आव्हाने आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे होणारी आमूलाग्र स्थित्यंतरे यावर लक्ष केंद्रित करुन जागतिक आणि देशपातळीवरील धोरणे ठरवावी लागतील. आता आपण फक्त या कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली ती उद्भवण्यापूर्वीच आपण ती थांबवू शकलो असतो का आणि तसे असेल तर आपले काय चुकले व या चुका भविष्यात कशा सुधाराव्या लागतील, यावर विचार करूया.

कोरोनामुळे जे मृत्यू झाले त्या आकडेवारीचे विश्लेषण केले, तर ते प्रामुख्याने 70 टक्के मृत्यू हे अशा रुग्णांचे झाले की ज्यांना अगोदरच उच्च रक्तदाब, मधुमेह , हृदयविकार, अवाजवी लठ्ठपणा, मूत्राशयाचे व इतर अवयवांचे विकार अशा व्याधींनी ग्रस्त होते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे ज्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजारामुळे अगोदरच रुग्ण होत्या, त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण फारच जास्त आणि अवाजवी होते. त्यांना या व्याधी नसत्या तर त्यापैकी कित्येक कोरोनामुळे मृत्यू होण्यापासून वाचू शकले असते. आजपर्यंत जगात सुमारे 35 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला झाल्याची आकडेवारी आहे. वर नमूद केलेल्या व्याधींनी जर जे रुग्ण ग्रस्त होते ते तसे नसते तर कदाचित लाख लोकांचे प्राण वाचू शकले असते. अर्थात कोरोना नसतानाही या हृदयरोग, उच्च रक्तदाब, डायबिटीस, अपघात, आत्महत्या, तंबाखूसेवन इत्यादींमुळे कित्येक कोटी व्यक्ती अनैसर्गिकरीत्या मृत्यू पावतात. या सर्वांचे प्राण वाचण्याकरिता जागतिक आरोग्य संघटन तसेच सर्वच देशांच्या “रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्याबाबत” धोरणे आहेतच. त्यामध्ये संशोधनातून रोगाविरुद्ध प्रभावी औषधे शोधणे, त्याची भरपूर निर्मिती करणे, रुग्णांना ते उपलब्ध करणे, त्यांचे दर किफायतशीर ठेवणे, इस्पितळे-दवाखाने, हॉस्पिटल बेड्स, डॉक्टर्स, नर्सेसची संख्या वाढवणे, वैद्यकीय शिक्षणाचा व्यापक विस्तार करून त्यांची सर्वदूर उपलब्धता वाढवणे, हे सर्व नियंत्रित करण्याकरिता आरोग्यकरिता प्रशासकीय यंत्रणेचे जाळे उभारणे, विमा कंपन्यांमार्फत उपचार आणि औषधांचा खर्च भागवणे या गोष्टीचा अंतर्भाव असलेली धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करण्यावरच गेल्या शतकामध्ये भर राहिला. अर्थात, एकट्या-दुकट्या रोगासाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवून त्या रोगाचे रुग्ण तयार होणार नाहीत, असेही रोगप्रतिबंधाचे कार्यक्रम अपवादाने आहेतच; आणि त्याचे दृश्य स्वरूपात चांगले परिणाम जगाने पाहिलेही आहेत. पण एक बाब प्रकर्षाने स्पष्ट होते की, जगाचे सामूहिक आणि देशपातळीवरील आरोग्यविषयक धोरणे ही केवळ “रुग्णांवर उपचार” करून बरे करण्यावर केंद्रित राहिली आहेत. याकरिता “पेशंट-केअर” हा शब्द यासाठी रूढ झाला आहे. त्यामुळे जगाची धोरणे आरोग्याची नव्हे तर पेशंट केअरचीच आहेत, हे प्रथम सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.

खरे म्हणजे या धोरणांवर आधारितच व्यवस्था आणि सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्‍चर निर्माण झाले आहे. त्याला किंवा वैद्यकीय शिक्षणाला ‘आरोग्य क्षेत्र’ असे संबोधणे हाच मुळात दुटप्पीपणा आहे आणि तसा दुटप्पीपणा मानवाने निर्बुद्धपणे गेले शंभर वर्षे अंगीकारला आहे. ज्या पद्धतीने गेल्या दशकात काम झाले, त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे नाव जागतिक आरोग्य संघटने ऐवजी जागतिक “पेशंट केअर” संघटना तसेच देशाच्या आरोग्य मंत्रालयांना किंवा विभागांना रुग्ण मंत्रालय किंवा रुग्ण विभाग हीच नावे चपखलपणे बसू शकतात!

आता कोरोनाने अंतर्मुख होऊन मानवास आरोग्याबाबत नवीन धोरणे आखण्याची आणि जुन्या चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे. गेल्या शतकातील अनुभव विचारात घेता आता खडबडून जागे होऊन जगाने एका शब्दात सांगायचे तर लोक आरोग्यदायी कसे राहतील आणि त्यांचे रुग्ण होण्याचे प्रमाण कसे कमीत कमी ठेवता येईल, हा गाभा असलेली नीती अंगीकारणे व आरोग्य वर्धन धोरणे तयार करून ती राबविणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवणे आवश्यक राहील. त्याकरिता मग जागतिक पातळीवरील धोरणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यात बदल, सर्व देशांची धोरणे, शिक्षणपद्धती, प्रशासकीय यंत्रणा, त्या दिशेने संशोधन, तसे इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादींचा समावेश करून एका नवीन अध्यायाची सुरुवात करावी लागेल. सरकारे सध्या जो “आरोग्याच्या” नावाखाली पेशंट केअरवरच बहुतांश खर्च करतात त्यामध्ये बदल करून आरोग्य सुधारण्याकडे हा निधी वळवणे किंवा नव्याने उपलब्ध करून द्यावा लागेल. ज्या देशामध्ये रुग्णसंख्या जास्त त्या देशाचे सकल उत्पादनावर देखील काही प्रमाणात विपरीत परिणाम होतो, असेही संशोधन आहे. त्यामुळे हा रुग्णसंख्या घटविण्याच्या धोरणांचे नवीन वारे जगभर सुरू केले तर त्याचे सर्वच बाबतीत चांगले परिणाम दिसू लागतील. अर्थात, कुटुंबाचा आणि सरकारांचा जो खर्च औषधे”, डॉक्टरच्या फी, वैद्यकीय चाचण्या, हॉस्पिटलायझेशन, हॉस्पिटल व दवाखाने उभारणे यांवर होतो, त्यामध्ये प्रचंड बचत होऊ शकते. उदाहरणार्थ- जगात आज 70 लाख कोटी रुपयांचा खर्च नागरिकांच्या खिशातून औषधावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कररूपाने जातो. त्यामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे या खर्चात साठ-सत्तर टक्के बचत होऊ शकते.

ही “रुग्ण संख्या कमी करण्याची” धोरणे आखताना जे निर्णय घ्यायचे आहेत त्यामध्ये निधीपेक्षा नेतृत्वाची धमक आवश्‍यक राहील. उदाहरणार्थ- रस्ते अपघातामुळे तयार होणाऱ्या रुग्णसंख्येत घट करावयाची असेल, तर रस्त्यामधील सुधारणा, चालकांवर शिस्त ते येथपासून ते तंबाखू पिकावर बंदी, कंपन्यांवर कडक निर्बंध, अन्नभेसळीचे निर्मूलन, खाण्याच्या संस्कृतीमध्ये पैसे कमावण्यासाठी आलेल्या व्यापारी प्रवृत्तींना आळा अशा अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. क्षुल्लक गोष्टींमुळे रुग्ण तयार होतात त्याचे उदाहरण म्हणजे तोंडाला लावण्याच्या पावडरपासून ते गुटख्यामुळे होणारे कॅन्सर टाळता येतात. हेही आपण अनुभवले आहे.

माणसाने कोरोनाच्या धक्क्यातून सावरताना अंतर्मुख होऊन अशा चुकलेल्या वाटा बदलून नव्या धोरणाच्या माध्यमातून जगाला वाचवणे आवश्यक राहील. त्यामुळे सध्याच्या पेशंट केअर धोरणऐवजी “रुग्णसंख्या कमी करणे” हेच आरोग्य धोरण महाराष्ट्र राज्याने देखील पुढाकार घेऊन तयार करावे आणि भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी ते वापरावे हि विनंती. असे धोरण तयार करण्याकरीता काही मदतीची आवश्यकता भासल्यास मी सदैव तयार असेल.( या विषयावर माझा दि १७/०६/२०२१ रोजी दै लोकसत्ता मध्ये लेख प्रकाशित झाला आहे.)

आपला आदरपूर्वक,

(महेश झगडे)

Standard